पाऊस येतो तेव्हा वाटते कि …

पाऊस येतो अन पूर्ण पृथ्वीला आपल्या कुशीत घेतो ..

निसर्गात ही फेरबदल सुरु व्हायला लागतात,
तेच प्रदूषित ढग रोमँटिक वाटू लागतात,
वाटते कि तुझ्या मिठीत निघून यावे,
पण चिंब पावसातले माझे चिंब पडसे,
तुझ्या समीप ही नको जावे ..

पुन्हा वाहू लागतो डोंगर कापणारा धबधबा,
वाटसरूच्या वाटे प्रमाणे स्वतःच आपला रस्ता ठरवणारा,
वाटते कि त्याच वाटेवरून तुला घेऊन जावे,
पण वाट फारच खडकर,
तुझ्या कोमलतेला नको रुताया..

हिरवे गाव अन पाण्यात चालणारी न्हाव,
पाण्यातले जीव पाहण्यास, होतो पर्यटकांचा मेळावा
वाटते कि त्या बघ्यांमध्ये ‘तू’ अन ‘मी’ असावे,
पण आपण दोघंच बरे, फक्त एकांत मिळावा ..

लहान लहान पोरं नभाच्या छायेखाली नाचतात,
चिमुकल्यांची थयथयाट पाहून बालपणातल्या गोष्टी आठवतात,
वाटते कि हेच बालपण एकमेकांना सांगावे,
पण भीती वाटते तुटण्याची,
नको इतके जवळीक करावे ..

पाहता पाहता ओसरत जातो पाऊस ,
पावसातल्या ढगांचा ही गारवा कमी होतो
वाटता वाटता फक्त मज वाटतच राहते
हो नाही च्या ह्या लढाईत ,
तुला मनातले सांगायचे राहूनच जाते ..
तुला मनातले सांगायचे राहूनच जाते!

Published by अखिलेश कुलकर्णी

मराठी व इंग्रजी साहित्याला जोपासणारा एक कोवळा लेखक व कवी .

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started